वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागामार्फत शहरात नर्सरी करून पाच हजार रोपे बनविण्यात येणार आहेत. तसेच ही रोपे शहरातील विविध ठिकाणी लागवड करण्यात येणार आहेत.
याबाबत लोहारा नगरपंचायतीच्या वतीने लोहारा शहरातील सर्व विद्यार्थी, वृक्षप्रेमी यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, लोहारा नगरपंचायत स्वच्छता विभागामार्फत शहरामध्ये दोन ठिकाणी स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची नर्सरी तयार करून किमान पाच हजार रोपे बनविण्याचा मानस नगरपंचायतीने केलेला आहे. यामध्ये स्थानिक प्रजातींच्या झाडांची जास्तीत जास्त लागवड व्हावी यासाठी आपल्या सर्वांना आव्हान करण्यात येते की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फळांचे व विविध प्रकारचे बी बियाणे सहजासहजी उपलब्ध होत असतात. हे उपलब्ध झालेले बी-बियाणे नगरपंचायत कार्यालयामध्ये आणून जमा करावीत. या बियाण्यांपासून निर्माण होणारी रोपे शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा व नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत मागील दोन वर्षात नगरपंचायतीच्या वतीने शहरात दोन ठिकाणी जवळपास सहा हजार वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे ही झाडे आजही चांगल्या स्थितीत आहेत. ही झाडे चांगल्या प्रकारे वाढावीत यासाठी नगरपंचायतीच्या वतीने सतत प्रयत्न असतो. यावर्षीही शहरात पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. त्यामुळे शहरातील विद्यार्थी, वृक्ष प्रेमी, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच प्रत्येकांनी आपापल्या घरात किंवा घराशेजारी किमान एक वृक्ष लागवड करून यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे.
————–
लोहारा नगरपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. हा संकल्प यशस्वी होण्यासाठी शहरवासीयांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
गजानन शिंदे,
मुख्याधिकारी,
नगरपंचायत लोहारा