वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्रीय तपास यंत्रणांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आपण या प्रकरणात लक्ष घालून लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती लोहारा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २५) लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राजकीय सूडबुद्धीने कारवाया होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एखादा व्यक्ती केंद्र सरकारविरोधात बोलला की त्याच्या मागे ई डी लावली जाते हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांतही आता अशीच भावना निर्माण झाली आहे. कारण अशा प्रकारच्या घटना देशात घडत आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.
बुधवारी (दि.२३) पहाटे अशीच एक कारवाई करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाराष्ट्र विधानसभेचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी कोणतिही पूर्वकल्पना न देता केंद्रीय तपास यंत्रणेने येऊन धाड टाकणं म्हणजे लोकशाही व संविधानाची एक प्रकारे हत्याच करण्यासारखे आहे. अशा प्रकारे कारवाया करून केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून ज्या राज्यात भाजपा विरोधी सरकार आहे त्या सरकारमधील नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर करून तेथील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच त्या सरकारमधील मंत्र्यांना कारवाईची भीती दाखविली जात आहे. भारतीय लोकशाहीला काळीमा फसण्याचे काम या केंद्रातील सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. तरी माननीय महामहिम आपणांस विनंती आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालून लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, उपनगराध्यक्ष आयुब शेख, अभिमान खराडे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शिवसेनेचे शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार,युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, नगरसेवक जालिंदर कोकणे, अविनाश माळी, दिपक मुळे, प्रशांत काळे, आरिफ खानापुरे, राजेंद्र कदम, के. डी. पाटील, बाबा शेख, हेमंत माळवदकर, मिलिंद नागवंशी, रफिक शेख, रौफ बागवान, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, शब्बीर गवंडी, प्रकाश भगत, महमंद हिप्परगे, स्वप्नील माटे, दयानंद स्वामी, ऍड. दादासाहेब जानकर, भागवत वाघमारे, इस्माईल मुल्ला, राजपाल वाघमारे, बालाजी मेनकुदळे, संजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.