वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांनी दिलेल्या ऊसाचे बिल लोकमंगल कारखान्याने अद्याप दिले नाही. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
ऊस पाठवून आठ महिने झाले तरी अजूनही लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याने काही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. अगोदरच कोरोनाने मेटाकुटीस आलेला शेतकरी पेरणीसाठी हवालदिल झाला असून हक्काचे पैसेही मिळत नसल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. याविरूध्द आता राष्ट्रवादी कॉग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष जगादिश पाटील यांनी बुधवारी ( दि.३०) लोहारा तहसिलदारांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागले. परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत. आता पेरणीसाठी उदारीने बि – बियाणे, खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे. एका माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक करावी ही बाब योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी दिली आहे. पुढील दहा दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे मिळाले नाही तर या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने कारखाण्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील, राष्ट्रवादी लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, तौफिक कमाल, ताहेर पठाण, सरफराज इनामदार , अमित कांबळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाचे पैसे त्यांना वेळेत मिळाले तर त्यांना उपयोग होतो. लोकमंगल कारखान्याबद्दल बिलासंदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कारखान्याने पुढील दहा दिवसांत बिल अदा केले नाही तर तीव्र आंदोलन करणार आहोत. जगदीश पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी