सन २०२५-२६ गळीत हंगामातील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज् लि. लोहारा खुर्द ता. लोहारा या कारखान्याला उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे बिले तात्काळ काढणेबाबत आदेश द्यावेत अशी मागणी सास्तुर पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्त संजय कोलते यांच्याकडे केली आहे.
लोकमंगल कारखान्याकडे या गळीत हंगामातील ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. या संदर्भात सास्तुर गणाच्या सदस्या प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्त संजय कोलते यांची साखर आयुक्तालय पुणे येथे भेट घेतली. यावेळी ऊस बिलासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. लोहारा खुर्द या कारखान्यामध्ये सन २०२५-२६ या गळीत हंगामामध्ये सदर कारखान्याच्या परिसरामधील शेतकऱ्यांनी या कारखान्याला मोठ्या प्रमाणात उस पुरवठा केला असता अद्याप शेतकऱ्यांची बिले निघाले नसून या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर कारखान्यास विचारणा केली असता १५ डिसेंबर २०२५ च्या पुढील उस पुरवठा करणारे मोठे शेतकरी जे ज्यांची रक्कम सहा लाखाच्या पुढे निघत असेल त्यांची बिले अद्याप जमा नाहीत, तसेच १५ जानेवारी २०२६ रोजीच्या पुढील उस पुरवठा करणाऱ्या शेतकच्यांची बिले अद्याप त्यांच्या खात्यावरती जमा नाहीत.
सदर बाब योग्य नसून सध्यास्थितीला शेतकऱ्यांना त्यांच्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी पेरणी असेल, कुंटुंबामधील लग्न सोहळा असेल इतर आवश्यक बाबींसाठी उस बिल हे महत्वाचे असून शेतकरी सद्यस्थितीला फार अडचणी मध्ये व मानसिक तणावामध्ये आहे. या भागातील संबंधीत शेतकऱ्यांनी माझ्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने तक्रारी मांडल्या असून व मी स्वतः शेतकारी या नात्याने माहिती देत असून याची आपण तात्काळ दखल घेवून उर्वरित सर्व शेतकऱ्यांची बिले तात्काळ संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती उस बिलाच्या रकमा जमा करण्याचे आदेश सदर कारखान्याला द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश कारखान्याला देण्यात आल्याचे प्रगती घोटाळे यांनी सांगितले.








