लोहारा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात लोहारा तालुक्यातील सेवानिवृत्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत भास्कर बेशकराव यांची लोहारा तालुका सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लोहारा शहरात ही बैठक घेण्यात आली. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँक अधिकारी बापट यांनी सेवानिवृत्तीच्या काळात आर्थिक व्यवहार, लोन व इतर सवलती व आता होत असलेल्या सायबर क्राईम याबद्दल माहिती सांगितली. जिल्हाध्यक्ष प्रदीप मोकाशी यांनी संघटनेच्या कामाबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी सिद्रामप्पा तडकले यांनी संघटनेतील शिक्षकांच्या अडी अडचणी व होणाऱ्या विलंबावर चर्चा केली. या बैठकीमध्ये लोहारा तालुका महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी धडाडीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. मनोहर वाघमोडे यांची विभागीय स्तरावर संघटक पदी निवड झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाल्याने गुरुवारी (दि.१९) निवड करण्यात आली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काही काळ कार्यभार सांभाळलेले एक कुशल संघटक, सर्वांशी हसत खेळत राहणारे, मन मिळाऊ स्वभावाच्या व्यक्तीची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारीची तालुका अध्यक्षपदी निवडीचे स्वागत करण्यात आले. तसेच बब्रुवान बादुले यांची संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड जिल्हाध्यक्ष प्रदीप मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
या निवडीवेळी राज्य संघटक शिवाजी सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्रामप्पा तडकले, बसवंत गायकवाड, महादेव राठोड, महावीर गडदे, राजेंद्र तांबे, एसबीआय बँक अधिकारी बापट, पतसंस्था सचिव चंदनशिवे, बब्रुवान बादुले, माजी गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे, शरणप्पा शिदोरे, मदन कुलकर्णी, शांतवीर जट्टे यांच्यासह शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. भास्कर बेशकराव यांनी मनोगत व्यक्त केले. मनोहर वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. देविदास बनसोडे यांनी आभार मानले.