लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील खरेदी करून पालकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या बाल आनंद मेळावा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जवळपास दीडशे स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने विविध खाद्यपदार्थ तसेच शेतमाल विक्रीस ठेवला होता. भेळ, पाणीपुरी, अप्पी, मोमोस, ऊसाचा रस, लस्सी, वडापाव, ज्यूस यांसारखे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी घरातून तयार करून आणले होते. काही स्टॉल्सवर हस्तकला वस्तू आणि शालेय साहित्याचीही विक्री करण्यात आली. शाळेने आयोजित केलेल्या या बाल आनंद मेळावा उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. स्टॉलसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी, खर्चाचा अंदाज, वस्तूंची किंमत ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि विक्रीनंतर नफा-तोट्याचा हिशोब ठेवणे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वतः केल्या. त्यामुळे पैशांचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास यांचा विकास झाला. दरम्यान या मेळाव्यात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून जवळपास पाच हजार रुपयांच्या खाद्यपदार्थाची विक्री केल्याचे शिक्षकांनी सांगितले. शालेय जीवनात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

बाल आनंद मेळावा हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा एक प्रभावी उपक्रम आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय फावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, उपाध्यक्ष अमिरहमजा खुटेपड, सदस्य जसवंतसिंह बायस, आयुब शेख, अमोल बिराजदार, बालाजी मक्तेदार, संजय संदीकर, सुर्यकांत पाढरे, रेखा नारायणकर, परवीन पठाण, सुनीता लोहार यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








