शाळेत काही बालपणापासून एकत्र तर काही नंतर आलेले सोबती. त्या लहान वयात जमलेली घट्ट मैत्री अधिक बहरत गेली. शेवटी दहावीच्या निरोप समारंभात तेव्हा अनेकांच्या पापण्या ओलावल्या होत्या; दहावीनंतर बहुतांश जणांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. त्या आठवणी २५ वर्षे जपून ठेवल्या होत्या. त्या आठवणींची कुपी प्रत्येकाने उघडली. आठवणींच्या हिंदोळ्यावर हे सवंगडी पुन्हा झुलले. आणि आरे-कारे म्हणत २५ वर्षांनंतर आठवणीत दंग झाले. याला निमित्त होते ते लोहारा तालुक्यातील कानेगावमधील श्री संत मारुती महाराज विद्यालयात २०००-०१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक काशिनाथ पवार होते. यावेळी बलभीम रसाळ, त्र्यंबक कदम, शिवाजी पवार, कारभारी सर, सुरवसे सर, विवेकानंद क्षीरसागर, शिवाजी कांबळे, गिरी सर, मुस्कावाड मॅडम, सेवक कल्याणी वैरागकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सध्या कोण कोणत्या पदावर काम करत आहे आदींसह शालेय जीवनातील आठवणी आदींबाबत मनोगताद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. दुपारी स्नेहभोजन झाल्यानंतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला सहा डिजिटल बोर्ड भेट म्हणून देण्यात आले. प्रास्ताविक पद्माकर कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कदम व व्यंकट महानवर यांनी तर महादेव भुरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्माकर कदम, परमेश्वर अडसुळे, अर्चना भरगांडे, सचिन पाटील, ज्योती मोरे, मनोरमा कदम, ज्योती पाटील, रजनी नायर, बालाजी थोरे, सलाउद्दीन सय्यद, व्यंकट महानवर, सुनील माने, महेश कदम, महादेव भुरे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.













