लोहारा नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापती, स्थायी व विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.२१) नगरपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. यात स्थायी समितीसह विषय समितीचे सभापती, सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. दोन विषय समितीच्या सभापती पदाचे अर्ज अवैध झाल्याने दोन सभापती पद रिक्त राहिले.
लोहारा नगर पंचायत सदस्यांचे स्थायी समिती, विषय समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन तसेच विषय समितीचे सभापती निवडीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमा अन्वये स्थायी समिती, विषय समित्यावर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी व त्यांचे सभापती निवडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लोहारा बु. नगर पंचायतच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२१) सर्व सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार रणजित कोळेकर व लोहारा बु. नगरपंचायतचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नगराध्यक्षा वैशाली खराडे, कार्यालयीन अधिक्षक मनोज खराडे यांच्या उपस्थितीत हा निवडीचा कार्यक्रम पार पडला.
यात सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समितीच्या सभापती पदी कमल भरारे यांची निवड करण्यात आली. या समितीत सदस्य म्हणून शमाबी शेख व संगीता पाटील यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम व अर्थ समितीच्या सभापती पदी (पदसिद्ध) उपाध्यक्ष अमीन सुंबेकर यांची निवड झाली आहे. या समितीत सदस्य म्हणून शामल माळी व विजयकुमार ढगे यांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिसारण तसेच महिला व बालकल्याण या दोन समितीचे सभापती पद रिक्त ठेवण्यात आले आहे. सभापती पदाचे अर्ज अवैध झाल्याने दोन्ही सभापती पदे रिक्त राहिले आहेत अशी माहिती मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी सांगितले. सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिसारण समितीत सदस्य म्हणून आरती कोरे, सुमन रोडगे व आरिफ खानापुरे यांचा समावेश आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीत सदस्य म्हणून सारिका बंगले व आरती गिरी यांचा समावेश आहे. यावेळी स्थायी समितीचे गठण करण्यात आले आहे. स्थायी समितीच्या सभापती पदी (पदसिद्ध) नगराध्यक्षा वैशाली खराडे यांची तर सदस्य म्हणून उपाध्यक्ष अमीन सुंबेकर व कमल भरारे यांची निवड झाली आहे. निवडीनंतर विषय समिती सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडीसाठी सुरू होती रस्सीखेच
विषय समितीच्या सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले. असे असतानाही दोन विषय समितीच्या सभापती पदाची निवड रिक्त राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
