लोहारा शहरातील महाशिवरात्री यात्रा महोत्सवास २५ वर्षे पूर्ण होत असून यावर्षीच्या रौप्य महोत्सवी यात्रा महोत्सवात पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत हा यात्रा महोत्सव होणार आहे. या रौप्य महोत्सवी यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लोहारा शहरात यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या रौप्य महोत्सवी यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी (दि. २६ फेब्रुवारी) या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या दिवशी शोभायात्रा होणार आहे. या शोभयात्रेचे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच महादेवाची आरती होईल. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव (महिलांसाठी ) होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२७) सकाळी साडे अकरा वाजता शिवभक्त संजय महाराज वेळापुरेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३५ तोळे चांदीची महादेवाची पिंड शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्यास लोहारा खुर्द येथील नरहरी सुग्रीव रसाळ यांच्या वतीने रु. ५०००/- व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २८) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य जंगी जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. चौथ्या दिवशी शनिवारी (दि.१) सकाळी १० वाजता महादेव मंदिर येथे महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री आठ वाजता हभप शिवलिलाताई पाटील यांचे कीर्तन होणार आहे. पाचव्या दिवशी रविवारी (दि.२) सकाळी दहा वाजता बसवेश्वर महाराज मंदिर येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहेत. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावर्षी रौप्य महोत्सवी यात्रा महोत्सव आहे. त्यामुळे याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी चोख नियोजन केले जात आहे.
