लोहारा Lohara) तालुक्यातील आष्टाकासार येथील शुभांगी सगर या विद्यार्थिनीस तिच्या शिक्षणासाठी धाराशिव (Dharashiv) येथील धारासुरमर्दिनी महिला स्वयंसेवी संघ यांच्या वतीने २५ हजार रुपयांचा निधी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
धारासुरमर्दिनी महिला स्वंयसेवी संघाच्या माजी अध्यक्ष स्व. मंजुषा कोकिळ यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या मुली मीरा कोकिळ ब्रम्हपुरकर व नेहा कोकिळ देशपांडे तसेच त्यांचे पती बाळासाहेब कोकिळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन वर्षांपासून दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्यांची आर्थिक बाजू नाजूक असते तसेच आर्थिक विवंचनेमूळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या मुली आहेत. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. मागील महिन्यात आष्टाकासार येथील स्व. सुवर्णा सगर यांच्या बद्दलची माहिती वर्तमानपत्रात वाचली. त्यांनी केलेले अवयवदान आणि त्यांचा मुलगा व मुलीने घेतलेला निर्णय मनाला भावला. त्यानंतर कोकीळ भगिनींनी याबाबत माहिती घेऊन आष्टा हायकुल आष्टाकासार येथील शिक्षक मुकेश सोमवंशी यांच्याशी फोन वरती संपर्क करून मुलीची माहिती घेतली. तसेच याच संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती डॉ. अनार साळुंखे यांनीही संपर्क साधून माहिती घेऊन नंतर तिची निवड केली. त्यानुसार शुभांगी सगर या विद्यार्थिनीस तिच्या शिक्षणासाठी २५ हजारांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले.
धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालात महिलांसाठी घेण्यात आलेल्या सन्मान कार्यक्रमात बोलावून शुभांगी सगर हिची आज्जी व भाऊ गणेश सगर यांच्या हातात निवडीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. अनार साळूंखे, विद्यमान अध्यक्ष ढगे मॅडम, संस्थेच्या सर्व सदस्य तसेच विष्णू सगर, सिद्रामप्पा तडकले, माजी उपसरपंच कल्लाप्पा गाडेकर, विवेक सोमवंशी, आष्टा हायकुल येथील क्रीडा शिक्षक मुकेश सोमवंशी मुलीची आज्जी आणि भाऊ गणेश सगर उपस्थित होते. या संस्थेने शुभांगी सगर हिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.