महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या वतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात बुधवारी (दि.२७) कर्ज वाटप मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात लोहारा व उमरगा तालुक्यातील १४० महिला स्वयं सहायता गटांना तीन कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लोहारा व उमरगा तालुक्यातील १४० स्वयंसहायता समूहांना तीन कोटी २५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. या मेळाव्यासाठी लातूरचे सहाय्यक सरव्यवस्थापक अविनाश कामतकर उपक्षेत्रिय व्यवस्थापक माधव पालेपाड, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या धाराशिव शाखेचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, लोहारा शाखेचे व्यवस्थापक अविनाश हुमने, मयूर थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात उमेद अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सखी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे कर्ज घेऊन वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय करणाऱ्या उद्योजक महिलांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश कामतकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वयंसहायता गटांना कर्ज मंजुरी पत्र व धनादेशचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यावेळी अविनाश कामतकर यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना व त्यातून मिळणारा लाभ याविषयी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी स्थानिक पातळीवर विविध उद्योग व्यवसाय निर्माण करावे व ऑनलाईन, इतर माध्यमांचा वापर करून त्याची विक्री कशाप्रकारे वाढवता येईल याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी गटांना कर्ज वितरण कोणत्याही आडकाठी शिवाय व जास्तीत जास्त रक्कम देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी उमेद गटाविषयी सविस्तर माहिती दिली व कर्ज परत फेडीचे महिलांचे प्रमाण शंभर टक्के असल्याने बँकांनी जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करावे याबाबत बँकांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक राजीव गांजरे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल मोरे व सौरभ जगताप यांनी केले.
या मेळाव्याला उमेद व धान फाउंडेशन मधील कार्यरत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व सीआरपी बँक सखी व इतर सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे शाखा व्यवस्थापक अविनाश हुमने यांनी आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राजीव गांजरे, अविनाश हुमने, लोहारा व उमरगा तालुक्यातील सर्व शाखा व्यवस्थापक, उमेदचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.