लोहारा तालुक्यातील विलासपूर (पांढरी) येथे इयत्ता चौथी ते बारावीमध्ये गावातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक म्हणून रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील विलासपूर पांढरी गावचे सुपुत्र, अणदूर येथील जवाहर कॉलेजचे प्राचार्य कै. व्यंकटराव गणपतराव पाटील यांनी २०२३ पासून त्यांचे आई वडील श्रीमती कोंडाबाई व कै. गणपतराव पाटील यांच्या स्मरणार्थ इयत्ता चौथी ते बारावीमधून गावातून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक म्हणून व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. परंतु जून २०२४ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. २०२३ या पहिल्या वर्षीचे बक्षीस वितरण समारंभ वेळी बोलताना कै. व्यंकटराव पाटील म्हणाले होते की, मी असो वा नसो, माझ्या जाण्यानंतर ही बक्षीस वितरण कार्यक्रमाची प्रथा माझे कुटुंबीय चालू ठेवतील. जेणे करून माझ्या गावातील विद्यार्थी यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. माझे हे छोटेसे गाव अधिकाऱ्याचे गाव म्हणून नावा रूपास यावे. ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या या शब्दाला जागत पाटील कुटुंबीयांनी हा पवित्र वसा चालू ठेवत हा कार्यक्रम चालू

ठेवला आहे. २०२४-२५ या वर्षातील बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी सर्व बक्षीस विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी बसवेश्वर हायकुलचे प्राचार्य भोसले सर, पर्यवेक्षक आर .व्ही पाटील, मडोळे सर, डी.एल बिराजदार, सरपंच मारुती कार्ले, सेवानिवृत्त शिक्षक पी. व्ही. कार्ले, डी. एम. कार्ले, व्यंकट चिकटे, देटे सर, सिद्रामया स्वामी, ऍड. नागनाथ मुर्गे, उज्वला लोखंडे, इंजिनियर श्री. बेळे, इंजिनिअर श्री. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का मुर्गे यांनी केले. व्यंकट चिकटे यांनी आभार मानले.
