वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रुग्ण सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्वाचे असते. त्यांचे कौशल्य, विनयशीलता, कामातील अनुभव यामुळे रुग्ण आजारातून लवकर बरा होण्यास मदत होते. म्हणून परिचारिका या त्या रुग्णालयाचा कणा असल्याचे प्रतिपादन सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी ( दि. १२ ) जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. फ्लोरेन नायटिंगेल यांचे विचार परिचारिकांनी आत्मसात करावे असे आवाहन यावेळी जोशी यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमात सर्व परिचारिकांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या रुग्णसेवेचा या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण जगावर कोविड महामारीचे भीषण संकट आले असताना कोविडमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना असतानाही संपूर्ण जगात परिचारिकांनी झोकून देऊन कोविड तसेच इतर रुग्णांची सेवा केली. त्यांचा या योगदाना मुळेच कोव्हिडचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. परिचारिकामधील एकजिनसीपणा, टीमवर्क मुळेच रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळते.परिचारिकांच्या या कार्याचा अभिमान वाटतो व परिचारिकांच्या या निस्पृह योगदानास आम्ही सलाम करतो असेही जोशी यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी स्पर्शचे वरिष्ठ डॉ. अशोक मस्के, सर्जन डॉ. मनीष सिन्हा, स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिपीका चिंचोळी, डॉ. वैभव माडजे यांच्यासह सर्व परिचारिका तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.