वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मूळची लोहारा तालुक्यातील भातागळी येथील परंतु हल्ली मुक्काम लातूर येथे असलेली नितीशा संजय जगताप हिने यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. यूपीएससी परीक्षेत नितीशा देशात १९९ व्या रँक ने उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नितीशाचे वडील संजय जगताप यांचे मूळ गाव लोहारा तालुक्यातील भातागळी आहे. त्यांना दोन्ही मुली आहेत. दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देता यावे यासाठी त्यांनी पुणे येथे घर केले. नितीशाचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन महाविद्यालयात बीए (सायकॉलॉजी) चे शिक्षण पूर्ण केले आहे. पदवीपर्यंत ती वर्गात टॉपर होती. बारावीच्या नंतर तिच्या मनात विचार आला की, आपण प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यानंतर तिने पुणे येथील खाजगी क्लासेस जॉईन करून तयारी सुरू केली. वयाच्या २१ व्या वर्षी तिने यूपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेत तिने उत्तुंग यश मिळवत देशातून १९९ व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नितीशा संजय जगताप हीचे मूळ गाव लोहारा तालुक्यातील भातागळी आहे. त्यामुळे भातागळी सह लोहारा तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
नितीशा बद्दल सांगताना तिचे वडील संजय जगताप व आई अश्विनी जगताप म्हणाले की, नितीशा लहानपणापासून हुशार व जिद्दी होती. तिने हे यश मिळवले त्याबद्दल खूप आनंद झाला आहे. नितीशा जगताप हिने सांगितले की, सामाजिक कार्य करता यावे तसेच समाजातील गरजू लोकांना मदत करता यावी अशी माझी इच्छा आहे. त्याच मुळे मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. नितीशा जगताप हिने जिद्द व कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे.