शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत’ लोहारा तालुक्यातील ५४० निवडक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) ३५० क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.
आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि उन्नत तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महाडीबीटी लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते. यामधून पारदर्शक पद्धतीने संगणकीय लॉटरीद्वारे ५४० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलोच्या बॅगचे वाटप तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या देखरेखीखाली करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांसाठी एकूण ३५० क्विंटल प्रमाणित व उच्च दर्जाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. १०० टक्के अनुदान असल्याने शेतकऱ्यांना यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांत बियाण्यांचे वाढलेले दर आणि हवामानाची अवकृपा यामुळे शेतकरी संकटात होता. मात्र, शासनाच्या या १०० टक्के अनुदानाच्या योजनेमुळे लोहारा तालुक्यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मोफत मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लोहारा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.








