आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० या उपक्रमाअंतर्गत लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या आदेशानुसार व प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमात धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखूमुक्त जीवनाचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात एनसिडी समुपदेशक गणेश नेवरे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, तसेच तरुण पिढीला त्यापासून दूर ठेवण्याचे महत्त्व सांगितले. यानंतर दंत शल्य चिकित्सक डॉ. संगीता चोरमले यांनी विद्यार्थ्यांना कर्करोग, हृदयरोग तसेच व्यसनाधीनतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी निरोगी, व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी विकसित केलेले ‘तंबाखूमुक्त युवा अभियान ३.०’ साठीचे डिजिटल साहित्यही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मितीचा संकल्प केला.












