लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता हायस्कूल येथील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयास भेट दिली.
यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी परवानगी दिली व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उज्वल कारभारी यांनी संपूर्ण रुग्णालयाची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. प्रत्येक विभागाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. ओपीडी, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, बालविभाग, समुपदेशन केंद्र, रुग्णांची पाहणी, त्यांच्या समस्या व त्यावरील उपाय आदी विद्यार्थ्यांनी सर्व जाणून घेतले. यावेळी एक्स-रे मशीन व ईसीजी मशीन याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकेचे निरसन केले. सर्दी, खोकला, ताप या आजारावरती प्राथमिक उपचार कशा पद्धतीने करता येईल याची माहिती देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत थीम दाखवण्यात आली. व्यसनामुळे होणारे आजार याबद्दल माहिती देण्यात आली. कॅन्सर, हार्ट अटॅक अशा गंभीर आजाराबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे (हावळे) यांनी या भेटीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यासमवेत शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक संजय कांबळे, गजानन माळी, मनोज लोहार, आशा चौरे, स्नेहा पवार यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, आरोग्य, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचे महत्व अंगीकारण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी दिली.












