सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कृतीचा जाहीर निषेध करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना बुधवारी (दि.८) निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने बूट फेकून लोकशाही विरोधी अमानुष अशोभनीय कृत्य केले आहे. हे कृत्य भारतीय न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर व घटनात्मक मूल्यावर झालेला अत्यंत घातक हल्ला आहे. या घटनेत सहभागी असलेला वकील स्वतःला सनातनी व मनुवादी विचारांचा अनुयायी म्हणवतो आणि बूट फेकताना त्याने दिलेल्या घोषणेमधून त्याचा जातीयवाद व वर्चस्ववाद हेतू स्पष्ट दिसून येतो. भूषण गवई हे भारतीय न्याय संस्थेतील उच्चतम पदावर कार्यरत असलेले दलित समाजातील अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या विरोधात केलेले हे कृत्य सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात जाणारे आहे.

लोहारा तालुक्यातील लोकशाहीप्रेमी व संविधानप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय संविधानाच्या आत्म्यावर आणि न्यायाच्या मूल्यांवरचा हल्ला आहे. म्हणूनच या प्रकरणातील संबंधित आरोपीवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकारच्या असंविधानिक जातीवादी प्रवृत्तींना पाठिंबा देणाऱ्या घटकांचाही योग्य तपास करून तात्काळ अशा लोकांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अमित सुरवसे, उत्तम भालेराव, अमीरहमजा खुट्टेपड, काकासाहेब भंडारे, दिगंबर कांबळे, पंकज सोनकांबळे, महेश गोरे, बालाजी यादव, इस्माईल शेख, बालाजी माटे, रावण कांबळे, प्रथमेश कांबळे, विद्यासागर कांबळे, किशोर भालेराव, राजेश मस्के, नोमान पठाण, मोजाब कुरेशी, शरद मस्के, सुमित कांबळे, अमोल सूर्यवंशी, कृष्णा सूर्यवंशी, हनुमंत कुंभार, गोंधळवाड दत्ता, लक्ष्मण रोडगे, विवेकानंद कांबळे, शंकर कांबळे, पटेल इब्राहिम, सचिन मस्के, नारायण कांबळे, गणेश कांबळे, ज्ञानेश्वर भालेराव, कलाप्पा दुपारगुडे, रोहित शिंदे, विकी शिंदे, राज भंडारे, अमोल गायकवाड, पुरुषोत्तम सीतापुरे, दगडू माटे, नितीन रोडगे, मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.












