उद्धव ठाकरे (uddhav thakre) यांनी फेसबुक लाईव्ह (facebook live) केलं म्हणून टीका करतात. पण तो काळ गर्दीत जाण्याचा नव्हताच. पण तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी किती पत्रकार परिषद घेतल्या ते सांगा. हिम्मत असेल तर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन दाखवा असे म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. जे लोक जाती धर्मात भांडणे लावण्याची कामे करतात त्यांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushama andhare) यांनी केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यासह अनेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (omraje nimbalkar) यांच्या प्रचारार्थ लोहारा (lohara) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (दि.२८) रात्री शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी लोहाऱ्याचे माजी सरपंच नागन्ना वकील हे होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष नरदेव कदम, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, दीपक जवळगे, बाबासाहेब जाधव, नगरसेविका मयुरी बिराजदार, सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, सुवर्णमाला नारायणकर, शामसुंदर तोरकडे, बाबुराव शहापूरे, शामल वडणे, अनिल जगताप, संजय कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाने जनतेला सांगितलं होतं. पंधरा लाख खात्यात येणार. पण १५ लाख खात्यात आले नाहीत. २०१४, २०१९ च्या निवडणुकीत यांनी रोजगार देतो असं सांगितलं होत. पण रोजगार मिळाला नाही, दहा वर्षे झालं कोणतीही नोकरी भरती झाली नाही. सुशिक्षित बेरोजगारांनी परीक्षेसाठी भरलेल्या चलनाद्वारे रक्कम जमा केली. पण पेपर फुटला म्हणतात. पण त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरलेली विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत का दिला जात नाही. हा खूप मोठा घोटाळा आहे. पंधरा लाखाच काय झालं, महागाईच काय झालं, दरवर्षी दोन लाख रोजगाराच काय झालं, याबाबत भाजपचे (bjp) भक्त काहीच बोलत नाहीत. कापूस, सोयाबीनला सध्या भाव नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात विक्रमी ११ हजार भाव मिळाला. भाजपाने जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम समाज भडकवला आहे. जे लोक तुम्हाला हिंदू मुस्लिम खेळात अडकवत आहेत त्यांना विचारा मुस्लिमांना गॅस सिलेंडर १२०० रुपयांना मिळतो. मग हिंदू लोकांना कमी पैशात मिळतो का हे तुम्ही विचारलं पाहिजे. फडणवीसांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण केला. हे पाप करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस आल्यापासून कायद्याचं राज्य राहील नाही. पोलिसांचं राज्य राहील नाही. याला आरोग्य खात दिलं. पण याला हाफकीन काय माहित नाही असं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.
ही निवडणूक महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची आहे. तुम्हाला सध्या जाहिराती खूप बघायला मिळत आहेत. सारखे चारशे पार दाखवत आहेत पण लोकांनो काही काळजी करू नका, हे दोनशे पार पण जाणार नाहीत. जाहिरात वाईट गोष्टींची होत आहे. उद्धव ठाकरेंनी कधी जाहिरातबाजी केली नाही. कोरोनाच्या काळात उत्तरप्रदेश मध्ये प्रेत नदीत तरंगत होती. पण महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्रात छान काम केलं. ज्यांच्या बाप जाद्यांनी पक्ष वाढवला त्यांना आता काय वाटत असेल. पण या गद्दार लोकांनी पक्ष चोरला. भाजपाचे लोक आलं की त्यांना विचारा महागाई, रोजगाराच काय झालं. भाजपवाले म्हणतात वन नेशन वन इलेकशन. पण आमचा वन नेशन वन एज्युकेशनचा नारा आहे. केजरीवालची भीती वाटत होती म्हणून यांनी त्यांना आत टाकले आहे अशी टीका अंधारे यांनी केली. तसेच ज्या उद्धव ठाकरे यांना वर्षा निवासस्थानातून बाहेर निघताना पाहिलं आहे. त्याच उद्धव ठाकरे यांना यापुढील काळात त्याच मानाने पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानात आम्ही शिवसैनिक नेणार आहोत असा निश्चय केल्याचे सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या सभेसाठी विठ्ठल बुरटूकणे, महेबूब गवंडी, रघुवीर घोडके, पंडित ढोणे, पवन मोरे, रौफ बागवान, रफिक शेख, प्रकाश होंडराव, शेखर पाटील, प्रेम लांडगे, मल्लिनाथ बनशेट्टी यांच्यासह लोहारा शहर व परिसरातील शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती.