लोहारा तालुक्यातील माकणी येथे आयोजित राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायत कार्यालय माकणी व मोरे कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा उत्तम सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी व्हावी या हेतूने ही परीक्षा सकाळी ११ ते १ या दरम्यान भारत विद्यालय माकणी येथे आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी धाराशिव सह सोलापूर, लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेत औसा तालुक्यातील टाका येथील अनन्वी साठे व किल्लारी येथील समिक्षा घोडके या दोघींनीही ९३.७५ गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. तसेच निलंगा येथील सोहम भोसले याने ९२.५०गुण घेऊन द्वितीय, तर ९० टक्के गुण घेणारे निलंगा येथीलच इलियास शेख, श्रेयस गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. एकूण २५ विद्यार्थ्यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती साठे होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, भास्कर बेशकराव, मनोहर वाघमोडे, माजी सरपंच विठ्ठल साठे, केंद्र प्रमुख बालाजी पवार, उपसरपंच फुलचंद आळंगे, समाधान मोरे, स्वाती मोरे, पंडित ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक समाधान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन गौरीशंकर कलशेट्टी यांनी तर गणेश साठे यांनी आभार मानले. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी सचिन ज्वेलर्स यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या परीक्षेसाठी अविनाश देशमुख, विक्रम जाधव, धनंजय कदम, गोवर्धन रणदिवे, अविनाश कांबळे, बाजीराव माने यांच्यासह स्थानिक शिक्षकांचे सहकार्य लाभले.
