वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील सात दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील चिरेबंदी विहीर गुरुवारी (दि.१४) ढासळली. जुन्या काळातील चिरेबंदी विहीरी आता इतिहास जमा होत चाललेल्या असतानाच ही घटना घडली आहे. जवळपास ७० वर्षापूर्वी गावासाठी जलसंजीवनी म्हणून दगडी चिरेबंदी कलेची ही विहीर बांधण्यात आली होती. १९९३ च्या भूकंपात गावाची पडझड झाली. त्या नुकसानीमुळे पुनर्वसन झाले. तरीही या विहिरीचे अस्तित्व टिकून होते. यावरून विहिरीचे बांधकाम किती पक्के होते हे लक्षात येते. मागील पाच सहा दिवसाच्या सततच्या पावसामुळे गुरुवारी (दि. १४) विहिरीचे दगडी बांधकाम ढासळून विहिरीत कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवत याबाबत प्रशासनास तात्काळ माहिती दिली. कास्ती खुर्दचे सरपंच सागर पाटील व गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.